कडेगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय. त्यामुळे केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन व इतर पाच दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आले. मात्र यात विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आला नसल्याने अनेक क्षेत्रांत अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे, असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.
याबाबत प्रांताधिकारी गणेश मरकड यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, सरकारी निर्णयाबाबत संभ्रमावस्था आहे. शनिवार, रविवार पूर्णपणे लॉकडाऊन आणि इतर दिवशी नियम व अटीनुसार दुकाने सुरू, असा निर्णय योग्य आहे. परंतु सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद, हा निर्णय चुकीचा आहे. तसा आदेशही नसताना प्रशासन जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास सांगत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार सोडून इतर दिवशी दुकाने सुरू करण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, कडेगाव तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, पलूस तालुकाध्यक्ष विजय पाटील, पलूस पं. स. सभापती दीपक मोहिते, कडेगाव पं. स. सभापती मंगल क्षीरसागर, नगरसेवक नीलेश येसुगडे, प्रकाश गढळे, कडेगाव नगरपंचायत गटनेते उदय देशमुख उपस्थित होते.
फोटो ओळ : राज्य सरकारने अघोषित लॉकडाऊनचा केलेला निर्णय तत्काळ मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन कडेगाव येथे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना देताना संग्राम देशमुख, राजाराम गरुड.