कामेरी : जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने समाजप्रबोधनासाठी चालवलेली सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ कौतुकास्पद असून लोकसाहित्य व ग्रामसाहित्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथे जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सात जानेवारी हा त्यांचा जन्मदिन ‘लोकसाहित्य दिन’ म्हणून जाहीर करावा. तसेच त्या दिवशी दरवर्षी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या संस्थेस अथवा व्यक्तीस ‘डॉ. सरोजिनी बाबर जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करावे व त्यांचे साहित्य महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुनर्प्रकाशित करावे, अशी आग्रहाची विनंती करणारे निवेदन जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, परिषदेच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख अमित कुदळे यांनी दिले. यावेळी ते बोलत होते
यावेळी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा छाया पाटील, दुधगावचे सरपंच विकास कदम, प्रा. अनिल पाटील, शीतल पाटील व विपुल कुदळे उपस्थित होते.
मंत्री जयंत पाटील यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून या मागण्या मान्य करून घेण्याचे आश्वासन दिले. या निवेदनासोबतच या विषयाच्या अनुषंगाने बागणी, दुधगाव, रोझावाडी, शिगाव, फार्णेवाडी गावच्या ग्रामपंचायतींनी एकमुखाने पास केलेले ठरावही जोडलेले आहेत.
फोटो ओळी- १७०१२०२१-कामेरी न्यूज
पालकमंत्री जयंत पाटील यांना निर्मलाताई पाटील, अमित कुदळे यांनी निवेदन दिले. यावेळी छायाताई पाटील, विकास कदम, प्रा. अनिल पाटील, शीतल पाटील व विपुल कुदळे उपस्थित होते.