लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्ममान्यता मिळावी, यासाठी वर्षानुवर्षे लढा सुरू आहे; पण ‘नागपूरच्या’ आदेशाने ती रोखल्याचा आरोप दिल्लीचे जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी यांनी रविवारी केला.
येथील श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये लिंगायत महामोर्चाचे समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर यांच्या ‘लिंगायत धर्मआंदोलन’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अॅड. भोसीकर, बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, उद्योजक प्रदीप दडगे, नगरसेवक संतोष पाटील, संचालक अशोक पाटील उपस्थित होते.
चन्नबसवानंद महास्वामी म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी जगाला समता आणि महिला सक्षमीकरणाचा मूलमंत्र दिला. त्यासाठी कर्मकांडाला विरोध करत लिंगायत धर्म स्थापन केली. अक्कमहादेवींना पीठाचे प्रमुख बनविले. त्यांच्या विचारांचा जगभर आदर्श घेतला जातो. लंडनमध्येही पुतळा उभारला जातो. मात्र, बसवेश्वरांचा आदर्श रोखण्याचे काम होत आहे. लिंगायत धर्ममान्यतेसह आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने झाली. पूर्वी स्वतंत्र धर्ममान्यता होती. ती परत देण्यास केवळ नागपूरच्या आदेशामुळे खो बसत आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुराप्पा समाजाचे असूनही ते निर्णय घेत नाहीत. जोवर ते मुख्यमंत्री आहेत तोवर तो तसा निर्णय घेणारही नाहीत. त्यामुळे हा लढा आणखी ताकदीने लढण्याची आवश्यक आहे.
सुधीर सिंहासने प्रास्ताविक यांनी केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी विनायक शेटे, जयवंत मोतुगडे, नीळकंठ कोरे, सिद्राम सलगरे, रवींद्र केंपवाडे, योगेश कापसे, संचालिका सविता आरळी, मंगला सिंहासने, अलका कोरे, विद्या झाडबुके, सतीश मगदूम, राजेंद्र लंबे, महादेव केदार, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :- येथील लिंगायत बोर्डिंगमध्ये लिंगायत महाआंदोलन पुस्तकाचे प्रकाशन जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. अविनाश भोसीकर, सुधीर सिंहासने, प्रदीप दडगे, संतोष पाटील, अशोक पाटील, विनायक सिंहासने, नीळकंठ कोरे आदी उपस्थित होते.