ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाच्या डोंगरावर वीज कोसळून दहाजण जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अॅड. नंदकुमार विठोबा बंडगर (वय ४४), बाळासाहेब विठोबा बंडगर (४२, दोघे रा. ढालगाव), बाळासाहेब यशवंत थोरात (५०, रा. मुंबई), संतोष गणपत कोळेकर (२५, रा. ढालगाव), राजकुमार शंकर गावडे (१७, रा. कवठेमहांकाळ), गजबर जमाल तांबोळी (२७, रा. ढालगाव), सुशांत सोपान बंडगर (२५, रा. डोर्ली) आणि अन्य दोघे जखमी झाले आहेत. त्यातील एका महिलेचे केस जळाले आहेत, तर एका पुरुषाच्या डोळ्यात जखम झाली आहे. ढालगाव येथील बंडगर कुटुंबीय नातेवाइकांसह डोंगरावर भोजनासाठी गेले होते. दुपारी एकच्या सुमारास जोरदार वारा व विजेचा कडकडाट सुरू झाला. बिरोबा मंदिराच्या निवारा शेडमध्ये बंडगर कुटुंबीय व पाहुणे बसले होते. शेडजवळच वीज कोसळली. विजेचा धक्का बसून अनेकजण बेशुद्ध झाले. काही वेळानंतर ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांना ढालगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरेवाडी येथील बिरोबा बनात वार्याने झाड पडून माणिक शामराव जमदाडे (३७, रा. मणेराजुरी) किरकोळ जखमी झाले, त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. ढालगाव, नागज, आगळगाव, आरेवाडी, निमज, घोरपडी परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. (वार्ताहर)
ढालगावात वीज कोसळून दहा जखमी
By admin | Updated: May 28, 2014 00:45 IST