लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत नगरपालिकेसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वच निवडणुका सुरेश शिंदे व आम्ही एकत्र लढविणार आहोत. राजकीय पक्ष वेगळे असले तरी, काँग्रेसविरोधात समविचारी पक्षांना सोबत घेतले जाईल, अशी घोषणा माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली.
जत शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील विद्यानगर येथे वीर शिवा काशीद उद्यानाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आमदार विक्रम सावंत हे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. बंदिस्त पाईपलाईनचा पाठपुरावा आम्ही केला होता. फक्त चावी फिरवून पाणी सोडण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोप करून जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाला विरोध करून पाडाव करण्यासाठी सुरेश शिंदे व आम्ही एकत्र आलो आहे. विधानसभेत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्यात आमदार विक्रम सावंत अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जत तालुक्याची विधानसभेत बदनामी होत आहे. सुरेश शिंदे व आमचा पक्ष वेगळा असला तरी, समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहे. यापुढील कालावधीतही एकत्र येऊन सर्वच निवडणुका आघाडी स्थापन करून लढविण्यात येणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली.
माजी सभापती सुरेश शिंदे म्हणाले आगामी जत नगरपालिका निवडणुकीत विलासराव जगताप व आमची युती असणार आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, लक्ष्मण एडके, जयश्री मोटे, स्वप्नील शिंदे, उमेश सावंत, प्रकाश माने, उत्तम चव्हाण, संतोष देवकर, संतोष मोटे व नाभिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट ः
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष, काँग्रेसचे नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक अनुपस्थित होते.