रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथील तलावाजवळ पवार वस्तीनजीकच्या पुलाजवळ कामेरकर माळाकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या बिबट्यास एका माेटार चालकाने पाहिले. अचानक गाडीच्या पुढे बिबट्या चालत निघाल्याने त्याने वाहन थांबविले. यावेळी उजेडातून अंधारात जाईपर्यंत बिबट्या पाहण्यासाठी या रस्त्यावर वाहनधारकांनी गर्दी केली. रेठरे धरण तलाव परिसरात पवार परिवारातील सुमारे दहा ते बारा घरे, तसेच उगळे कुटुंबीयांचे घर आहे. लोक उन्हाळ्यामुळे घराबाहेर बसतात व रात्रीही अंगणातच झोपतात. बिबट्याच्या दर्शनामुळे वस्तीवरील लोकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मरळनाथपूर डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्तीवर एका गायीच्या कालवडीवर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला केला हाेता. मरळनाथपूर परिसरात कुत्री, जनावरे व शेळ्यावर हल्ला होण्याच्या चार ते पाच घटना गेल्या महिन्याभरात घडल्या आहेत.