दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील पुजारवाडीनजीक असणाऱ्या टिंगरेवस्ती परिसरात शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान अंधारात दिसलेला प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
पुजारवाडी नजीकच्या टिंगरेवस्ती येथील अमोल पुजारी व संग्राम पुजारी हे चुलते-पुतणे दिघंची येथून गणेशमूर्ती घेऊन घराकडे निघाले होते. टिंगरेवस्ती येथील ओढापात्राजवळ आले असता रात्री आठच्या दरम्यान ऊसाच्या एका फडातून दुसऱ्या फडामध्ये पट्टेरी वाघ सदृश्य प्राण्याने उडी मारल्याचे त्यांना जाणवले. याबाबतची माहिती त्यांनी वस्तीवरील नागरिकांना सांगितली. त्यामुळे बिबट्याचा संशय घेऊन परिसरात शंभर ते दोनशे लोकांनी उसाच्या फडाकडे धाव घेतली.
ही माहिती मिळाल्यावर वन विभागाचे वनक्षेत्रपाल ए. डी. खाडे, वनरक्षक ए. के. खापरकर, वनपाल बी. पी. बालटे व कर्मचाऱ्यानी तातडीने भेट दिली. संबंधित प्राण्याबाबतच्या खाणाखुणा पडताळल्या. यावरुन दर्शन घडलेला प्राणी तरस असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.