शिराळा : रिळे (ता. शिराळा) येथे बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. तर, एक शेळी जखमी झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रिळे, बेलेवाडी, अस्वलवाडी परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
रिळे येथील शेतकरी आनंदा नाथा पाटील यांच्या शेतातील विहिरीचा ओढा येथे शेळ्यांचा छोटेखानी गोठा आहे. या गोठ्यात बुधवारी पहाटे ५ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून वस्तीवरील दोन शेळ्या ठार केल्या. यावेळी एक शेळी जखमी झाली. या वस्तीवरील कुत्रेही बिबट्याने पळवून नेले आहेत. यामध्ये पाटील यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे. घटनास्थळी वनरक्षक हनुमंत पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. थोरात यांनी भेट देऊन पंचनामा केला. शासनाला यासंदर्भात अहवाल पाठवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त करावेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. यावेळी संजय पाटील, डी.एन. पाटील, संपत पाटील, शिवाजी पाटील, बाबू पाटील, रामचंद्र पाटील व शेतकरी उपस्थित होते. वनविभागाने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी रिळेचे उपसरपंच बाजीराव संकपाळ यांनी केली आहे.