कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे गेल्या शुक्रवारी बिबट्याने थरार निर्माण केला होता. त्यानंतर हा बिबट्या कोठे गेला, याचा शाेध घेण्यात येत असताना शनिवारी पुन्हा कसबे डिग्रजच्या शिवारात त्याच्या पायाचे ठसे आढळून आले. यामुळे बिबट्याचा मुक्काम याच परिसरात असल्याचे स्पष्ट हाेत आहे.
मागील आठवड्यामध्ये कसबे डिग्रज येथे बागणवाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर वन विभागासह नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पुन्हा आढळून आला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असताना वन विभागाची भूमिकाही शंकास्पद राहिली. शाेध घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका वन विभागाने घेतली नाही. माेहीम राबवली नाही. आठवडाभरानंतर येथील महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या कल्याण जोशी यांच्या शेतामध्ये गोठ्याजवळ बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले. त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याचा कसबे डिग्रज परिसरातच मुक्काम असल्याचे स्पष्ट हाेत आहे.
वन विभागाने या बिबट्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वन विभागाने त्याचा शोध घ्यावा अन्यथा जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी दिला आहे.
फोटो : १९ कसबे डिग्रज २
ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील महावितरण केंद्रामागे बिबट्याच्या पायांचे ठसे दिसून आले.