लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेरीनाला योजनेबाबत महापालिकेने अद्याप धूळगाव ग्रामपंचायतीसोबत करार केलेला नाही. त्यामुळे दरवर्षी धुळगावकरांना पाण्यासाठी याचना कराव्या लागतात. त्याबाबत आता कायदेशीर लढा देऊन आक्रमक आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी दिली.
ॲड. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक पार पडली. शिंदे म्हणाले की, शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे पाणी धुळगावला नेण्याची योजना आखली. या योजनेमध्ये महापालिका क्षेत्रातील दूषित पाणी शुद्ध करून धुळगावच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत देण्याचे आश्वासन दिले. तसेच इतरही अनेक आश्वासने देण्यात आली. त्यापैकी कोणतेही आश्वासन आजअखेर पूर्ण केलेले नाही. दरवर्षी धुळगावकरांना शेरीनाल्याच्या पाण्यासाठी महापालिकेकडे याचना करावी लागते.
शेरीनाल्याचे पाणी मिळणार असल्यामुळे धुळगावकरांना इतर सर्व पाणी योजनेतून वगळण्यात आले आहे. महापालिकेकडे वारंवार विनंती करूनही या योजनेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे या प्रश्नावर आक्रमक लढा उभारण्यासाठी धुळगाव ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करीत या योजनेसाठी कायदेशीर व आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ग्रामस्थांची पंधरा सदस्यीय समिती बनविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बैठकीस अजितसिंह डुबल, भास्कर डुबल, डॉ. विनोद डुबल, अमर जाधव, सागर जाधव, आकीब मुजावर, जयंत जाधव, महालिंग हेगडे, सुधीर भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.