अशोक पाटील -- इस्लामपूर नगरीचे प्रथम नागरिक सुभाष सूर्यवंशी यांच्यावर त्यांच्याच समाजातील वडापाव विक्रेता जितेंद्र सूर्यवंशी याने अचानकपणे खुनीहल्ला केला. याविरोधात राष्ट्रवादीने सर्वपक्षीय निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये पोलिस खात्याला टार्गेट करुन नेत्यांनी आपली बोटे आपल्याच डोळ्यात घातली. अशा घटनेला राजकीय नेतेच जबाबदार असल्याचे सांगत, नेत्यांनीच नेत्यांना आत्मपरीक्षणाचे धडे दिले.पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी, संशयित आरोपी हा माथेफिरु अथवा मनोरुग्ण नाही. त्याच्यामागील मास्टर मार्इंड वेगळाच आहे, असा आरोप करुन, या निषेध सभेला राजकीय रंग दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, शहाजीबापू पाटील, रोझा किणीकर, डॉ. संग्राम पाटील, काँग्रेसचे आर. आर. पाटील, विजय पवार, भाजपचे विजय कुंभार, शिवसेनेचे शकील सय्यद, महाडिक युवा शक्तीचे सुजित थोरात यांनी, शहरात बेकायदेशीर व्यवसायांनी उच्छाद मांडला आहे, या व्यवसायांना कोणाचे अभय आहे याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी पोलिसांचेच वाभाडे काढले.माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी आपल्या निषेध भाषणात वेगळाच मुद्दा मांडला. शहरातील लोकप्रतिनिधींनी फक्त खुर्चीत बसून समाजसेवेचा गवगवा करु नये, तर रात्रीच्या वेळी चौका-चौकातून फेरफटका मारावा. म्हणजे शहरात फाळकूट दादांचे किती पेव फुटले आहे हे दिसून येईल. हे फाळकूट दादा शहरातील नसून बाहेरगावचे टवाळखोर युवक आहेत. हे फाळकूट दादा गुटखा आणि मटक्याचा मेळ घालून मोफत वाफ—वायचा आनंद लुटतात. यातूनच वादावादीच्या घटना घडत आहेत. अशा घटनांवेळी सर्वसामान्य नागरिक भीतीपोटी मध्ये पडत नाहीत. त्यामुळेच शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे. रात्री—अपरात्री बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लगावला.माजी नगरसेवक रणजित मंत्री यांनी सर्वच नेत्यांना खडे बोल सुनावले. निषेध सभेत पक्ष, गट—तटाचा संबंध येतच नाही. त्यामुळे मी शहरातील सर्वसामान्य जनतेच्यावतीने निषेध करण्यासाठी उभा आहे. सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्यानंतरच नेत्यांना जाग आली आहे. मध्यंतरीच्या काळात उद्योजक रमेश शेटे यांच्यावरही खुनीहल्ला झाला होता. तसेच इस्लामपुरात असे किती तरी हल्ले झाले आहेत. त्यावेळी हे नेते कुठे गेले होते? असा सवाल त्यांनी केला.एकंदरीत या झालेल्या निषेध सभेत इस्लामपूर शहर कसे असुरक्षित झाले आहे, याचाच कित्ता प्रत्येकाने गिरवला आहे. मटका, खासगी सावकारी, बेकायदेशीर गुटखा, दारु, शस्त्र विक्री, अनैतिक व्यवसायासाठी खुली असलेले लॉज अशा गोष्टी गुन्हेगारीला बळकटी देत आहेत. या गुन्हेगारांना खत-पाणी घालण्याचे काम नेतेच करत आहेत, असा सूर बैठकीत निघाला. याच्या बंदोबस्ताचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार विलासराव शिंदे, बी. के. पाटील, प्रा. शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, पं. स.चे सभापती रवींद्र बर्डे, नगरसेवक कपिल ओसवाल, संजय पाटील, विजयबापू पाटील, आनंदराव मलगुंडे, पीरअली पुणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.जयंतरावांचे खडे बोल..!सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला, त्याअगोदर एक दिवस माजी मंत्री, आमदार जयंत पाटील गणपती आरतीच्या निमित्ताने शहरात मंडळांना भेट देत होते. योगायोगाने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत जयंत पाटील सामील झाले होते. त्यावेळी लावलेल्या ध्वनिक्षेपकाचा आवाज मोठा असल्याने पोलिस अधिकारी कार्यकर्त्यांना आवाज कमी करण्यास सांगत होते. याची कुणकुण जयंत पाटील यांना लागली. त्यांनी त्या अधिकाऱ्याला बोलावून, ‘अगोदर शहरातील मटका बंद करा, मगच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा’, असे खडे बोल सुनावले होते.स्वच्छ चारित्र्याचे नेते हवेत...सहकार समूहातील तज्ज्ञ बी. डी. पवार निषेध करताना म्हणाले, इस्लामपुरातील विकास, नियोजन यावर प्रा. शामराव पाटील यांच्यासारख्या तज्ज्ञ मंडळींची समिती नेमली होती. परंतु ती आता अस्तित्वात नाही. पालिकेच्या राजकारणात स्वच्छ चारित्र्याचे प्रतिनिधी असावेत. या त्यांच्या विधानाने व्यासपीठावरील सर्वच नेते अवाक् झाले.
नेत्यांचे नेत्यांनाच आत्मपरीक्षणाचे धडे
By admin | Updated: September 16, 2016 23:44 IST