सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर २१ फेब्रुवारीपासून फौजदारी करण्यात येईल, असा इशारा महापौर विवेक कांबळे व उपमहापौर प्रशांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला. प्रत्येक दुकानांसमोर जाऊन ही मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये महापौर, उपमहापौर, आयुक्त व उपायुक्त स्वत: सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एलबीटीची वसुली नसल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्याचा विकासकामांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे एलबीटीच्या वसुलीशिवाय पर्याय राहिलेला नाही. महापालिकेची जकात १२० कोटी रुपये होती. आता नैसर्गिक वाढीमुळे जकात दीडशे कोटींपर्यंत जाते. इतकाच कर व्यापाऱ्यांना भरावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रामध्ये एलबीटीसाठी नऊ हजार व्यापारी पात्र असून, यापैकी २२०० व्यापारीच कर भरणा करीत आहेत. आजपर्यंत एलबीटीपोटी ५५ कोटी रुपये जमा झाले आहेत. अद्याप किमान शंभर कोटी रुपये येणेबाकी आहे. व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून वसूल केलेल्या एलबीटीचा भरणा होणे आवश्यक आहे.एलबीटी रद्द करण्यास आमचा विरोध नाही. यासाठी आवश्यक असल्यास व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करावे त्यासाठी आमचा पाठिंबा असेल. आता मात्र शासनाने त्यांना एलबीटी लागू केला आहे तो त्यांनी भरावा. जोपर्यंत एलबीटी रद्द होत नाही तोपर्यंत त्यांनी महापालिकेकडे भरणा करावा. आता त्यांना लागू असल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी आम्हाला कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरून कटू निर्णय घेण्यापासून आम्हाला थांबवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)महापौर, आयुक्त रस्त्यावर उतरणारएलबीटीच्या वसुुलीसाठी महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत. महापालिकेची २० रोजी सभा असून, यामध्ये ही माहिती देण्यात येईल. त्यानंतर २१ फेब्रुवारीपासून सर्व पदाधिकारी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर जाऊन कारवाई करणार आहेत.
एलबीटी : २१ पासून फौजदारी
By admin | Updated: February 13, 2015 23:23 IST