मिरज : शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाच्या ४६ कोटी थकबाकी वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीसाठी तिसरी व अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाने मालमत्ता जप्तीच्या दोन नोटिसा बजावल्या आहेत. कारखान्याने वसुलीला प्रतिसाद दिला नसल्याने तिसरी व अंतिम नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तिसऱ्या नोटिशीनुसार कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची जप्ती व लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.वसंतदादा साखर कारखान्याने २०१३ व १४ च्या गळीत हंगामातील उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले नाही. यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्याने साखर आयुक्तांनी ही रक्कम कारखान्याची मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. दि. २८ आॅगस्ट रोजी महसूल विभागाने वसुलीची दुसरी नोटीस दिली होती. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडून कारखान्यासमोरील कर्मचारी वसाहतीसह शेजारील २१ एकर भूखंड विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागविण्याचा प्रयत्न आहे. मात्र न्यायालयीन अडथळ्यांमुळे जमीन विक्री झालेली नाही. शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेवर जप्ती बोजा चढवून त्याचा लिलाव करून रक्कम वसूल करण्याचा इशारा तिसऱ्या नोटिसीद्वारे देण्यात येणार आहे. वसंतदादा कारखान्याच्या १७४ एकर मालमत्तेचे सह. दुय्यम निबंधकांकडून मूल्यांकन करण्यात आले आहे. १७४ एकर जमीन असलेल्या कारखान्याच्या सात-बारावर सुमारे २३५ कोटींचे कर्ज व थकबाकी आहे. जप्ती व लिलाव प्रक्रियेसाठी कारखान्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे जिल्हा मध्यवर्ती, बँक आॅफ इंडिया, विक्रीकर, व्यवसाय कर, ऊस बिल देय थकबाकी अशी यापूर्वीची २३५ कोटी थकबाकीची सात-बारा उताऱ्यावर नोंद आहे. त्यात नवीन ४६ कोटी ऊस बिलाची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्याची थकित देणी भागविण्यासाठी कारखान्याच्या जमीन विक्रीस शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र तहसीलदारांमार्फत थकित महसूल वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याने व जमीन विक्रीस न्यायालयात हरकत घेण्यात आल्यामुळे जमीन विक्री होऊ शकलेली नाही. सुमारे अडीचशे कोटी कर्जाचा डोंगर असलेल्या वसंतदादा कारखान्याचे व्यवस्थापन यातून कसा मार्ग काढणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. वसुलीच्या दुसऱ्या नोटिसीला कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने तिसरी नोटीस देण्यात येऊन दोन आठवड्याच्या मुदतीनंतर वसुली व जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
वसंतदादा कारखान्यास आता अंतिम नोटीस
By admin | Updated: October 31, 2014 01:12 IST