सांगली : मागील चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत सोमवारी लक्षणीय वाढ झाली. दिवसभरात ८४ इतक्या मोठ्या संख्येने बाधित आढळले असून, त्यात महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या संख्येने ४९ हजारांचा टप्पा पूर्ण केला.
या आठवड्यात सरासरी ३० नव्या रुग्णांची नोंद होत होती. सोमवारी याच्या चौपट रुग्णसंख्या सोमवारी आढळून आली. त्यात २२ रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून त्यासह शिराळा, तासगाव आणि कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या काळजी वाढविणारी ठरत आहे. सांगली शहरात १४ तर मिरजेत ८ रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३०७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ५७ जण बाधित आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३६२ चाचण्यांमधून २९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असून सध्या ३७५ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यातील ५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४५ जण ऑक्सिजनवर तर ६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
जिल्ह्यातील बाधितांची संख्या
आतापर्यंतचे एकूण बाधित ४९००४
उपचार घेत असलेले ३७५
कोरोनामुक्त झालेले ४६८६०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७६९
सोमवारी दिवसभरात
सांगली १४
मिरज ८
खानापूर १८
कडेगाव ११
शिराळा ८
तासगाव ७
मिरज, वाळवा प्रत्येकी ५
आटपाडी ४
जत ३
कवठेमहांकाळ १