कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील गणेश पाणीपुरवठा संस्थेसह तालुक्यातील सर्व संस्थांना भूविकास बँकेकडून घेतलेल्या कर्जास माफी मिळावी यासाठी सातत्याने अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले आहे. लवकरच तालुक्यातील भूविकास बँकेचा थकबाकी असलेला शेतकरी कर्जमुक्त होईल. असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
ते चव्हाणवाडी येथील सभासद, शेतकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत बोलत होते. नाईक म्हणाले, भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम मोठी आहे. बँकेची आपल्या तालुक्यासह राज्यात मोठी थकबाकी आहे. भूविकास बँकेकडे असलेली थकबाकी माफ करण्यासाठी शासन विचार करत असून याचा लाभ सर्व संस्थांच्या कर्जदारांना होणार आहे. आपण भूविकास बँकेचे कर्ज माफ होण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी १० लाख, राष्ट्रीय पेयजल योजनेतून येळापूर पाणी योजनेसाठी १ कोटी १५ लाख, येळापूर, जामदारवाडी, चव्हाणवाडी, समतानगर, सय्यदवाडी व कुंभवडेवाडीसाठी अंतर्गत काँक्रिटीकरण, रस्ते, गटर कामासाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यावेळी बाजार समिती संचालक दिनकर दिंडे, प्रचिती दूध संघाचे संचालक शिवाजी लाड, युवा नेते राजू खांडेकर, माजी सरपंच जयवंत कडोले, पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष राजाराम वाघमारे, डॉ. तानाजी पाटील, माजी उपसरपंच ज्ञानदेव पाटील, बाबुराव वडकर, राजाराम लोहार, लक्ष्मण वाघमारे, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.