मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे दोन महिन्यांपूर्वी ‘इंग्लिश बोलायला शिका’ या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या इंग्लिश शिकवणी वर्गाच्या चालकाने विद्यार्थ्यांची एक लाख रुपये फीची रक्कम घेऊन पोबारा केल्याने पालकवर्गात खळबळ माजली आहे. इंग्लिश शिकवणीसाठी ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.मालगाव येथे प्रकाश सोसायटीसमोर बाहेती बिल्डिंगमध्ये तासगाव येथील फ्युचर प्लस इंग्लिश अॅन्ड सॉप्ट स्किल ट्रेनिंग, शिवशक्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाबासाहेब देशमुख बँकेजवळ, सांगली नाका, तासगाव या नावे इंग्लिश बोला या नावाखाली इंग्लिश शिकवणीचा वर्ग सुरूकेला होता. या शिकवणी वर्गात गावातील इयत्ता ५ वी ते १० वीतील ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३००० रुपये वार्षिक वर्गणीही दोन टप्प्यात वसूल करण्यात आली आहे. ही रक्कम एक लाखाहून अधिक आहे. फी वसुलीच्या पावत्याही साळुंखे नामक शिकवणी वर्गचालकाने पालकांना दिल्या आहेत. केवळ एक महिनाच जेमतेम इंग्लिश शिकवणीचा वर्ग सुरू राहिला, त्यानंतर गेले चार महिने तो बंद आहे. तसेच शिकवणी वर्ग घेणारा चालक ३५ विद्यार्थ्यांची १ लाख रुपयांहून अधिक फी वसूल करून पसार झाला आहे. पालक दररोज आपल्या पाल्यास घेऊन शिकवणीसाठी येतात; मात्र वर्गच उघडला जात नसल्याने पालकांत भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)संपर्काचा मोबाईल बंद फी भरलेल्या पावतीवर फ्युचर प्लस इंग्लिश अॅन्ड सॉप्ट स्किल ट्रेनिंग शिवशक्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाबासाहेब देशमुख बँकेजवळ, सांगली नाका, तासगाव या पत्त्याबरोबर मोबाईल नंबरही आहे. पालकांनी या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता, बाहेरगावी आहे, शिकवणीचा वर्ग आज-उद्या चालू करणार असल्याची बतावणी करीत या वर्गचालकाने मोबाईलच बंद करून ठेवला आहे. त्यामुळे संपर्क होत नसल्याचे पालकांनी सांगितले. फसवणुकीबाबत पालक पोलिसात तक्रार करणार आहेत.
विद्यार्थ्यांना लाखाचा गंडा
By admin | Updated: December 17, 2014 23:57 IST