सांगली : येथील शिंदे मळा परिसरातील जुना कुपवाड रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ सतीश पान शॉप येथे अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. सुमारे १ लाख ६ हजार ९०० रुपयांची सुगंधी तंबाखू, पानमसाला, कातरलेली सुपारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पानपट्टीचालक सतीश भूपाल माळी याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुटखा, मावा, पानमसाला, सुगंधी तंबाखू व तत्सम पदार्थांच्या विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक व वितरणावर शासनाने बंदी घातलेली आहे. या आनुषंगाने गोपनीय माहिती काढून अन्न व औषध प्रशासनाने आज प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीचा संशय असल्याने सतीश पान शॉप येथे छापा टाकला. यावेळी तेथे मावा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळले. या पानपट्टीतून पानमसाला, कातरलेली सुपारी, सुगंधित तंबाखू व मावा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक मिक्सर असा एकूण १ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकानमालक सतीश माळी याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, स्वामी यांनी ही कारवाई केली.