इस्लामपूर : येथे राज्य पीजन फ्लायर्स असोसिएशनच्यावतीने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र कबुतर केसरी -इस्लामपूर २०२१ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक माजी नगरसेवक शिवाजी पवार व राज्य अध्यक्ष सॅम मायकल यांनी दिली.
पवार म्हणाले, या स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या कबुतरास महाराष्ट्र कबुतर केसरी किताबासह १ लाख ११ हजार रुपये रोख आणि यशोधन युथ फाऊंडेशनच्यावतीने मानाची गदा दिली जाणार आहे. उपविजेत्या कबुतरास ५१ हजार आणि मानचिन्ह दिले जाईल. राज्यात प्रथम क्रमांक येणाऱ्या कबुतरास सॅम मायकल व बाबुल मुश्रीफ यांच्याकडून १ लाख रुपयांची ठेवपावती बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. या पाचही जिल्ह्यांसाठी २५, १५ आणि ११ हजार व चषक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेतील प्रवेशासाठी रणजित पाटील, बाबुल मुश्रीफ, इरफान शेख, फारूख मणेर यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी केले आहे.