इस्लामपूर : येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिध्दी शैलेंद्र करांडे हिने भाेपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन मैदानी स्पर्धेत थाळी फेक या क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावून आशियाई स्पर्धेच्या निवड चाचणी शिबिरामध्ये स्थान निश्चित केले. तिने ४०.४९ मीटर थाळी फेकून तृतीय क्रमांकासह कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
महाराष्टातून अशाप्रकारची कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिध्दी करांडे हिने पुणे येथे झालेल्या ॲमॅच्युअर मैदानी स्पर्धेत ४०.५६ मीटर थाळी फेकून सुवर्णपदक पटकावले. महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाची विद्यार्थिनी श्रावणी रामचंद्र देसावळे हिने उंच उडी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही खेळांडूची गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲमॅच्युअर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
या खेळांडूना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरद पाटील व क्रीडा शिक्षक प्रा. भीमराव जाधव तसेच प्रशिक्षक विजय शिंदे, एनआयएस प्रशिक्षक अजित शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. कासेगाव शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, पर्यवेक्षक प्रा. दशरथ पाटील यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
फोटो - ३१०१२०२१-आयएसएलएम-कुसुमताई स्पोर्टस् न्यूज
इस्लामपूर येथे सिद्धी करांडेचा प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शरद पाटील, अजित शेळके उपस्थित होते.