इस्लामपूर : कुरळप (ता. वाळवा) येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची इमारत नव्याने बांधण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, माझे वडील रामराव पाटील यांनी १९६० साली कुरळप पोलीस ठाण्यास स्वतःच्या मालकीची ७ एकर जमीन विनामोबदला दिली हाेती. देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी कुरळप पोलीस ठाण्यास मंजुरी दिली आहे. माझे वडील रामराव विठोजी पाटील हे गावचे पोलीस व मुलकी पाटील होते. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख गफूर आमच्या गावात पोलीस ठाण्यासाठी जागा पाहण्यास आले होते. त्यांना आमची गंजीखान्याची जागा पसंत पडली. त्यांच्या शब्दाखातर वडिलांनी ही जागा पाेलीस ठाण्यास दिली. त्यावेळी कडक शिस्तीचे जिल्हाधिकारी के. शिवराम कृष्णन यांच्या हस्ते व माझे वडील रामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या मारुती मंदिरामध्ये पोलीस ठाण्याच्या स्थापनेचा कार्यक्रम झाला. पुढे ८-१० वर्षे याच मंदिरातून पोलीस ठाण्याचा कारभार चालला होता.
कुरळप पोलीस ठाण्याअंतर्गत २२ गावे आहेत. येथे सध्या ४१ कर्मचारी कार्यरत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी पोलीस ठाण्याची आकर्षक रंगरंगोटी केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकांशिवाय सर्व कर्मचारी कुरळप किंवा परिसरातील गावात भाड्याने रहात आहेत. आम्ही या प्रश्नात लक्ष घातले असून कोरोना व महापुराच्या संकटातून बाहेर येताच या कामासाठी जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
चौकट
वडिलांच्या दातृत्वाचा वारसा
पी. आर. पाटील म्हणाले, आमच्या भागातील १७ गावांना पूर्ण क्षमतेने वीज मिळत नव्हती. वीज मंडळाचे अधिकारी सबस्टेशन देऊ, मात्र जागेचे काय? असे म्हणत हाेते. मी त्यासाठी तत्काळ स्वत:ची साडेतीन एकर जमीन दिली. त्या बदल्यात गावातील मातंग, बौद्ध, धनगर व मराठा समाजातील चार हाेतकरु तरुणांना वीज मंडळात नाेकरीत घ्यायला लावले.