कुपवाड : शहरातील श्वेता विश्वनाथ उळागड्डी (वय २३, रा. बजरंगनगर, कुपवाड) या विवाहितेने शुक्रवार, दि. ५ राेजी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार कुपवाड पोलिसात दाखल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित पती विश्वनाथ संगाप्पा उळागड्डी (वय २६), सासरा संगाप्पा उळागड्डी (५७), सासू कमलाबाई (५२, तिघेही रा. बजरंगनगर, कुपवाड) या तिघांना अटक केली आहे.
शहरातील विश्वनाथ उळागड्डी याचा विवाह २८ जून २०२० रोजी मुचंडी (ता. जत) येथील प्रकाश शिवगौंडा नंदगौंडा यांची मुलगी श्वेता हिच्याशी झाला होता. तेव्हापासून तिचे सासरे, सासू, पती हे तिघेजण तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान केला नाही, हुंडा, सोने, बेड, फ्रीज, संसारसेट आदी वस्तू तुझ्या माहेरकडून आण, असे म्हणून तिचा मानसिक, शारीरिक त्रास चालिवला हाेता. तिला वेळोवेळी शिवीगाळ केली जात होती.
श्वेता हिने शुक्रवारी सासरच्या त्रासाला कंटाळून घरातील छताला नाॅयलाॅन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस तिचा पती, सासरा, सासू हे तिघेजण जबाबदार असल्याची तक्रार तिचे वडील प्रकाश नंदगौंडा यांनी शनिवारी सकाळी कुपवाड पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.