मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील चाळीस हजार लोकसंख्येच्या गावास गेली ३५ वर्षे लागलेली शुध्द पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा अखेर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी गावात दाखल झाल्याने संपली आहे. साडेतीन वर्र्षांत पूर्ण झालेल्या योजनेतून पाणी सोडण्यात आले. गावात दाखल झालेल्या कृष्णेच्या पाण्याचे पूजन सरपंच महावीर रुकडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले.पस्तीस वर्षांपूर्वी २२ गावांसाठी आरग-बेडग ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेत मालगावचा समावेश होता. मात्र ही योजना फार काळ टिकली नाही. पर्यायाने मालगावसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने पिण्याच्या पाण्यासाठी ३५ वर्षे हाल सोसले. गावाचा पिण्याच्या पाण्याचा भार कूपनलिकांवर होता. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले तरच या कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असे अन्यथा ग्रामस्थांना भटकंतीशिवाय पर्याय रहात नसे. प्रकाश उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश खोलकुंबे यांनी पाणी प्रश्न सुटावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासनाने नव्याने राबविलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी शासनाकडे सुधारित प्रस्ताव दाखल केला. शासनाने ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी दिली. सरपंच महावीर रुकडे, सदस्य विश्वास खांडेकर, विजय आवटी तसेच इतर पदाधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांनी सर्व अडथळे दूर केल्याने साडेतीन वर्षात ही योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून सोडण्यात आलेले कृष्णा नदीचे पाणी जलशुध्दीकरण टाकीत दाखल झाले आहे. या योजनेच्या पाण्याचे सरपंच रुकडे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच वहिदा शेख, सदस्य विश्वास खांडेकर, जयहिंदचे अध्यक्ष विजय आवटी, विजय आवटी, रशिद मुजावर, शिवाजी माळी, पांडुरंग पाटील, रावसाहेब माने, राम चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर) या योजनेमुळे मालगावचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. योजना सुरळीत चालावी, यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचे सरपंच रुकडे यांनी सांगितले.
मालगावमध्ये आले कृष्णेचे पाणी!
By admin | Updated: April 2, 2015 00:45 IST