लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ व वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार या वर्षी साम्यवादी विचारवंत व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ. भालचंद कानगो यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस अॅड. सुभाष पाटील यांनी दिली.
कॉ. कानगो हे विद्यार्थिदशेपासून साम्यवादी विचार आणि चळवळीत सहभागी आहेत. कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम रस्त्यांवर उतरून संघर्ष केला आहे. सुरुवातीपासूनच त्यांची मार्क्सवादावर निष्ठा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आयुष्यभर ज्या विचारांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत काम केले, त्याच विचारावरून आपली वाटचाल करणाऱ्या कॉ. कानगो यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दि. ६ ऑगस्ट रोजी विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या सभागृहात दुपारी १.३० वाजता बेळगावचे कॉ. प्राचार्य आनंद मेणसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, गौरवचिन्ह, श्रीफळ, पुष्पहार व रोख २१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.
चौकट :
आत्तापर्यंतचे मानकरी...
क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार आतापर्यंत आचार्य शांताराम गरुड, क्रांतिवीर नागनाथ (अण्णा) नायकवडी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार गणपतराव देशमुख, कॉ. कृष्णा मेणसे, मेघाताई पाटकर, विकास आमटे, डॉ. अभय बंग, पत्रकार पी. साईनाथ, कॉ. सीताराम येचुरी, पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना प्रदान करण्यात आले आहेत.