कवठेमहांकाळ : कोरोनाचा वाढता कहर पाहून बाजार समितीच्या माध्यमातून कवठेमहांकाळ येथे कोविड सेंटर उभा करणार आहोत.
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर उभे केले जाणार आहे, अशी माहिती युवा नेते राजवर्धन घोरपडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
हे कोविड सेंटर सुरुवातीला ३० बेडचे असून, ते कवठेमहांकाळ येथील बाजार समितीच्या हॉलमध्ये उभारण्यात येणार आहे.
शनिवारी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, कवठेमहांकाळचे नगराध्यक्ष पंडित दळवी यांच्यासह राजवर्धन घोरपडे यांनी या ठिकाणची डॉक्टरांसह पाहणी केली.
येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून येणाऱ्या आठवड्यात हे कोविड सेंटर सुरू होईल. गरजेनुसार आणखी बेड वाढवले जातील. तालुक्यातील कोरोनाचा वाढता कहर, ऑक्सिजनविना तडफडणारे रुग्ण, खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची ससेहोलपट रोखण्यासाठी कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजवर या तालुक्याने आम्हाला भरपूर दिले आहे. आज त्यातून उतराई होण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे राजवर्धन घोरपडे यांनी सांगितले.