लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आता २७ सप्टेंबरपासून तीन दिवस चालणार आहे. या खटल्याची सुनावणी जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी खून केल्याची घटना ६ नोव्हेंबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले या संशयितांच्या विरोधात खटला सुरू आहे. लूटमारीच्या संशयावरून अटक केलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर अमानुष थर्डडिग्रीचा वापर केल्याने पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयितांनी अनिकेतचा मृतदेह सुरुवातीला पोलीस गाडीतून आणि नंतर खासगी वाहनाने आंबोली घाटातील निर्जनस्थळी नेऊन जाळून खुनासारख्या गंभीर घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने संपूर्ण राज्याचे पोलीस दल हादरले होते. अनिकेत कोथळे खून खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी या खटल्याची सुनावणी होणार होती. पण तांत्रिक कारणामुळे ती लांबणीवर पडली. आता २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ही सुनावणी होणार आहे.