कवठेमहांकाळ : महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या फेरसर्वेक्षणाच्या निवाडा नोटीस तातडीने देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने सोमवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या फेरसर्वेक्षणाच्या निवाडा नोटीस तातडीने द्या, शिरढोण येथील नव्याने बाधित क्षेत्र बांधकामे, बोअरवेलच्या निवाडा नोटीस तातडीने द्या, शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या, कामगारविरोधी कायदे रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या.
शिरढोण येथे गेले बारा दिवस हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत सर्वेक्षण झालेल्यांच्या निवाडा नोटीस मिळणार नाहीत, तोपर्यंत शिरढोण येथील धरणे आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. यावेळी किसान सभेने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार गोरे यांना दिले. यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे, राजर्षी शाहू विचार मंचचे अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे, बाळासाहेब पाटील, रजनीकांत पाटील, हणमंत शिंदे, आनंदराव पाटील, सागर पाटील, अमित पाटील, रावसाहेब पाटील, लक्ष्मण चौगुले उपस्थित होते.