कवठेमहांकाळ : म्हशीच्या दुधाला प्रती लिटर ५० रुपये, तर गायीच्या दुधाला प्रती लिटर ३५ रुपये दर द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेतर्फे कवठेमहांकाळ येथे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तसेच दुधाच्या दरात कपात करणाऱ्या दूध संघ, डेअरी चालकांचा निषेधही किसान सभेतर्फे करण्यात आला.
कोरोनाच्या संकटात शेतकरी असतानाच दूध संघ, डेअरी चालकांनी दुधाच्या दरात कपात केली आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी दूध दरात कपात करून त्यांचे मोठे नुकसान केले आहे. म्हणून दूध संघ, डेअरी चालकांनी दूध दरातील कपात रद्द करून म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५० रुपये, तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. तसेच भाजप शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. शेतकऱ्यांसाठीचे घातक कृषी कायदे त्वरित रद्द करावेत, शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठीचा हमीभाव कायदा झाला पाहिजे, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी भगवान सोनंद, गुलाब मुलाणी, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, मच्छिंद्र पाटील, सुखदेव कदम, वसंत कदम, आदी उपस्थित होते.