शिरढोण : अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या निवाडा नोटिसा तातडीने द्याव्यात, या मागणीसाठी गेल्या वीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी साखळी उपोषण करून सरकारचा आंदोलकांनी निषेध केला.
मिरज तालुक्यातील ४१, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ५० गटांपैकी फक्त दोन गटाच्या नोटिसा मिळाल्या आहेत. यामधील प्रशासनाचे काय गौडबंगाल आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे महामार्गासाठी अतिरिक्त जमीन बाधित होत आहे. त्यामध्ये बांधकाम, कूपनलिका, फळझाडे बाधित होत आहेत. यांचा सर्व्हे पूर्ण झाला असून निवाडा नोटीस देणे बाकी आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या निवाडा नोटिसा अद्याप मिळालेल्या नाहीत. म्हणून आंदोलकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. रोज दोन शेतकरी साखळी उपोषणास बसणार असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी सांगितले. मंगळवारी अमित पाटील व सुनील करगने हे बाधित शेतकरी उपोषणास बसले आहेत. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, जिल्हा सरचिटणीस कॉ. दिगंबर कांबळे, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर नलवडे, गुलाब मुलाणी, चंद्रकांत गोडबोले, संतोष गोडबोले, रजनीकांत पाटील, सागर पाटील, माणिक पाटील, हणमंत शिंदे, मच्छिंद्र पाटील, तुळशीराम गळवे व शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते.