कवठेमहांकाळ : दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हाक्के यांचे भाऊ तानाजी बाबू हाक्के (वय ५८) यांच्यावर राजकीय वैमनस्यातून आठजणांनी कुऱ्हाड, काठ्यांनी खुनीहल्ला केला. या हल्ल्यात हाक्के गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. हल्लेखोर हे कोंडीबा पाटील गटाचे आहेत. सर्व आरोपी अद्याप फरारी असून, या घटनेने तालुक्यासह ढालगाव परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी तानाजी हाक्के यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत आठजणांविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुधेभावी गावात चंद्रकांत हाक्के व कोंडीबा पाटील यांचे राजकीय गट आहेत. हे दोन्ही गट अनेक वर्षे परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुधेभावी गावासह ढालगाव जिल्हा परिषद गटात हाक्के यांनी आर. आर. पाटील यांना मताधिक्य दिले, तर कोंडीबा पाटील यांनी भाजपचे अजितराव घोरपडे यांचा प्रचार केला होता. निवडणूक निकालापासून दुधेभावी गावात दोन्ही गटात अंतर्गत संघर्ष खदखदत होता. आज सकाळी दहा वाजल्यापासून चंद्रकांत हाक्के व तानाजी हाक्के शेतात कामगारांकडून जमीन सपाटीकरणाचे काम करून घेत होते. याचवेळी गावातील कोंडीबा पाटील यांचे समर्थक संभाजी फोंडे (वय ३0), तानाजी फोंडे (३२), धनाजी फोंडे (२१), आत्माराम फोंडे (४0), सोपान फोंडे (३0), रघुनाथ चोरमुले (३२), दामोदर गडदे (३३), नामदेव फोंडे (३४) हे आठजण हाक्के यांच्या शेतात आले. ‘तुझ्या शेतातून आम्हाला रस्ता दे, अन्यथा तुला ठेवणार नाही’, अशी धमकी तानाजी हाक्के यांना देत, त्यांना कुऱ्हाड, काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. हाक्के यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तानाजी हाक्के यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी संशयित आठजणांवर गुन्हा नोंदविला आहे. अद्याप आठही संशयित आरोपी फरार आहेत. (वार्ताहर)
चंद्रकांत हाक्के यांच्या भावावर खुनीहल्ला
By admin | Updated: October 31, 2014 01:12 IST