बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. येथे गुरू दत्तुआप्पा खोत व शिष्य सर्जेराव कदम यांच्या जोडीला हुतात्मा गटाला पराभूत करण्यात यश आले. अवघ्या दोन जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत दत्तू कदम गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
या ग्रामपंचायतीसाठी नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यात राष्ट्रवादीचेच दोन गट असलेल्या दत्तू कदम गटास चार व सर्जेरावबापू गटास पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र आता दोन जागांवर दत्तू कदम गटाने बाजी मारल्यामुळे मसुचीवाडी ग्रामपंचायतीत या गटाचे प्राबल्य वाढले आहे. या गटाकडे सहा जागा व सर्जेरावबापू गटाकडे पाच जागा असे बलाबल झाले आहे. त्यामुळे आता सरपंच पदाचे आरक्षण काय पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. पहिला सरपंच हा खोत गटाचा होणार, हे मात्र निश्चित झाले आहे.
चौकट
खोत गटाला संधी
सरपंच पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी झाले तर सरपंचाचा पहिला मान दत्तू खोत यांचे पुत्र संजय खोत यांना द्यावा लागणार. तसेच अनुसूचित जाती-जमाती वर्गासाठी आरक्षण पडले तरीही सरपंच खोत गटाचाच होणार. कारण ही जागा एकमेव या गटाकडे आहे.