इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची जुनी ऐतिहासिक इमारत कागदोपत्री ग्रामसभा दाखवून ३३ वर्षांच्या कराराने हडप करण्याचा डाव सत्ताधारी गटाचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून खेळला जात असल्याचा आरोप करीत, माजी सरपंच जयराज पाटील यांनी, कोणत्याही परिस्थितीत ही इमारत भाडेतत्त्वावर न देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.येथील पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार बैठकीत जयराज पाटील यांनी सरपंच अशोक कुंभार व ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ यांच्यावर तोफ डागली. पाटील म्हणाले की, सत्ताधारी गटाच्या दबावाने कामेरी—येडेनिपाणी सिंचन योजनेसाठी ही इमारत हडपण्याचा डाव आखण्यात आला आहे. १ मे रोजी ग्रामसभा झाली नसताना, ती कागदोपत्री झाल्याचे दाखवून ही इमारत भाड्याने देण्याचा केलेला ठराव बेकायदेशीर आहे. एखाद्या खासगी संस्थेसाठी ही इमारत हडप करण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्याला जोरदार विरोध करु. बेकायदेशीर ग्रामसभा झाल्याचे दाखवून इमारत कराराने देण्याचा केलेला ठराव रद्द करुन या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे जयराज पाटील यांनी सांगितले. लोखंडे यांनी सर्व प्रक्रियेला स्थगिती देऊन चौकशीचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी जयदीप पाटील, विनायक पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करादि. बा. पाटील म्हणाले, ही ऐतिहासिक इमारत भाडेतत्त्वावर देण्यास विरोध राहील. ही इमारत ग्रामपंचायत मालकीचीच राहिली पाहिजे. येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करावे. भाडेतत्त्वावर इमारत घेऊन भविष्यात ती स्वत:च्या मालकीची करण्याचा डाव यापाठीमागे आहे, तो हाणून पाडू. त्यासाठी ग्रामस्थांची ग्रामपंचायत इमारत बचाव कृती समिती गठित करुन विरोध करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामेरी ग्रामपंचायतीची जुनी इमारत हडपण्याचा डाव
By admin | Updated: May 22, 2015 00:11 IST