आष्टा : आष्टा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करताना गोपनीयता राखण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांच्यासह सर्व विरोधकांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत सूचना आहेत. आत्ता शहरातील यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये क्षेत्रिय अधिकाऱ्याकडून अनेकवेळा राजकीय दबावाला बळी पडून सत्ताधाऱ्यांना राजकीयदृष्ट्या लाभदायी अनुकूल फायदेशीर प्रभाग रचना केली जाते. तशी अलिखित परंपरा चालत आलेली आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो आरक्षण सोडत तिच्या दिनांकापर्यंत त्याची गोपनीयता राखण्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वीर कुदळे, वर्षा अवघडे, अमोल पडळकर, डॉ. सतीश बापट, नंदकुमार आटुगडे, विनय कांबळे, दिलीप कुरणे, उदय कवठेकर, राजकुमार सावळवाडे, पांडुरंग बसुगडे, अभयकुमार मंजुगडे उपस्थित होते.