अर्जुन कर्पे /कवठेमहांकाळ कवठेमहांकाळ येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षकांकडून येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय, दुजाभावाची वागणूक व मनमानी कारभाराने विद्यार्थी मानसिक दबावाखाली रहात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. कवठेमहांकाळ येथे साडेतीन वर्षापूर्वी सात कोटी रुपये खर्च करून अद्ययावत स्वरुपाचे वसतिगृह सुरू झाले. येथे शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असून, सध्या ७५ ते ६८ विद्यार्थी राहतात. परंतु या वसतिगृहात राहणारे हे सर्व मागासवर्गीय, गोरगरीब विद्यार्थी सध्या मोठ्या मानसिक दबावाखाली, अधीक्षकांच्या अन्याय, त्रासापुढे भरडून निघत आहेत. या विद्यार्थ्यांनी कुणाकडे तक्रार करायची म्हटल्यास, त्यांच्यावर अधीक्षकांच्या दबावाची टांगती तलवार असते. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामार्फत मोफत जेवण, स्टेशनरी, मासिक विद्यावेतन दिले जाते. परंतु या देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दिरंगाई, बोगसपणा, भ्रष्टाचार, निकृष्ट पध्दतीचे जेवण मिळते आणि हे सर्व कुणाला सांगितल्यास विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याऐवजी अन्यायच वाढतो. यामुळे विद्यार्थ्यांना हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज आणि अन्याय सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याची गाऱ्हाणे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे मांडली. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाकाहारी व आठवड्यातून दोनवेळा मांसाहारी जेवण दिले जाते. परंतु शाकाहारी जेवणामध्ये पापड, तूप, मूग, हरभरा, वाटाणा यांच्या डाळी देणे नियमाने बंधनकारक आहे. परंतु हा सकस आहारही विद्यार्थ्यांना दिला जात नाही. रोज एक फळ देणेही गरजेचे व नियमात आहे, परंतु तेही कधी दिले जाते, तर कधी नाही. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भातासाठी निकृष्ट दर्जाचा तांदूळ, तर दुधात पाण्याची मोठ्या प्रमाणात भेसळ करून दूध दिले जाते. तसेच मांसाहारी जेवणातही मोठी भेसळ असल्याची गंभीर तक्रार आज विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व प्रकारामुळे येथे राहणाऱ्या गोरगरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना सोळा वह्या व पुस्तकांचा संच मोफत देण्याची सुविधा शासन नियमानुसार आहे. परंतु येथे विद्यार्थ्यांना फक्त एक किंवा दोन वह्या दिल्या गेल्या आहेत, तर पुस्तकांचा पत्ताच नाही. हा सर्व प्रकार येथे अधीक्षकांमुळे घडत आहे. या अधीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे व विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर, शैक्षणिक अभ्यासावर परिणाम झाला आहे. अधीक्षकांच्या या मनमानी कारभाराला, त्रासाला कंटाळून, आमची स्वप्ने अधुरीच राहतात की काय? असा प्रश्नही या येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पडत आहेत. अधीक्षकाला समाजकल्याण अधिकारी कायमचा धडा शिकवणार आहे की नाही? अशी संतप्त विचारणा तालुक्यातील विद्यार्थी संघटना केली आहे. अधीक्षकांच्या कारभाराला लगाम घालून या अधीक्षकाला धडा शिकवावा. अन्यथा अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करू, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
कवठेमहांकाळ वसतिगृहातील विद्यार्थी तणावात
By admin | Updated: November 30, 2014 00:57 IST