सांगली : शहरातील विविध भागांतून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. राहुल राजेंद्र कांबळे (रा. कवठेएकंद, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
एलसीबीचे पथक बुधवारी सांगली शहरात गस्तीवर असताना, स्टेशन चौक परिसरात विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन एकजण उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित कांबळे यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यात त्याने दोन मोटार सायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. २९ ऑगस्ट रोजी चंदूर (ता. हातकणंगले) येथील विजय श्रीकांत शिंदे यांची दुचाकी गणेश मार्केट परिसरातून, तर अन्य एक मोटारसायकल साखर कारखाना परिसरातून चोरल्याची माहिती संशयिताने पोलिसांना दिली.
पाेलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.