ओळ : तासगाव-सांगली रोडवर पाणी संस्थाजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
प्रदीप पोतदार
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे एकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) हे तासगाव-सांगली मार्गावरील प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. लांबसडक पेठ भाग, समांतर रस्ते अशी रचना असलेल्या या गावात वाढत्या लोकवस्तीनुसार मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
गावात टाकाऊ कचरा निर्मूलनाची व्यवस्था नसल्याने कवठे एकंद जणू कचऱ्याचे आगार बनत आहे. यासाठी उपाययोजनांसह ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
कवठे एकंद परिसरातील कोल्ड स्टोरेज, बेदाणा वाॅशिंग व अन्य उद्योगातील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्याबरोबरच घरगुती कचरा व टाकाऊ साहित्याचे सार्वजनिक ठिकाणी होणारे ढिगारे पाहता गावातील प्रमुख रस्त्याला कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले आहे.
गावातील जुनी चावडी, सिद्धराज चौक, कुंभार गल्ली चिंचणी रोड, पाणी संस्था ऑफिस सांगली रोड, एसटी स्टँड चौक ते पाण्याची टाकी, तासगाव रोड अशा ठिकाणच्या सार्वजनिक परिसरात कचरा फेकून दिला जात आहे. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे आगारच बनत आहे. कचरा व्यवस्थापनाची ठोस उपाययोजना करून ग्रामस्थांत कचरा निर्मूलनाचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
चाैकट
झाडांनाही कचऱ्याची झळ
गावातील ए वन युवा मित्र मंडळाच्या पुढाकाराने गणपती मंदिर रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. आठ-दहा फूट वाढलेल्या गुलमोहराच्या झाडांना कचऱ्याने वेढले आहे. बऱ्याच वेळा कचऱ्याला पेटवून देण्याचे प्रकार घडतात यामुळे झाडांचे नुकसान झाले आहे. सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीला कचऱ्याची झळ बसत आहे. कवठे एकंद स्टँड चौक ते गणपती मंदिर स्टँड चौक परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.