कसबे डिग्रज : जुलै महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा मोठा फटका मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावाला बसला. शेती, घरे, दुकाने, छोटे व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली कोणतीही मदत त्यांना मिळालेली नाही. पूरग्रस्तांना अनुदान लवकर मिळावे अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना दिले आहे.
कसबे डिग्रज मधील पुरबाधित आणि स्तलांतरीत नागरिकांचे पंचनामे, पीक नुकसानीचे पंचनामे, दुकाने, छोटे व्यवसाय याचे पंचनामे झाले आहेत. मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे नेते यांनीही पाहणी करून मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. परिसरातील इतर गावांत सानुग्रह अनुदान मिळाले आहे; पण कसबे डिग्रजला अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे पूरग्रस्त हवालदिल झाले आहेत.