लाेकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करताना काेविड चाचणी अहवाल सक्तीचा केल्यामुळे म्हैसाळ (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण येत आहे. काेराेना प्रतिबंधक लसीकरण, बाह्यरुग्ण विभाग सांभाळण्याची कसरत करताना प्रवाशांच्या अँटिजन चाचण्यांचा व्याप वाढल्याने आधीच अपुऱ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कर्नाटक शासनाने कागवड येथे तपासणी नाका सुरू केला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करताना अँटिजन चाचणीचा अहवाल मागितला जातो. ताे नसेल तर कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. संबंधितांना चाचणी करण्यासाठी म्हैसाळच्या प्राथमिक आरोग्य केद्रांत पाठवले जाते. त्यामुळे दररोज शेकडाे प्रवासी अँटिजन चाचणीसाठी म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. सध्या शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. जास्तीत जास्त लसीकरण करून घ्या, अशा सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत. लसीकरण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ऑनलाइन नाेंदणी गरजेची आहे. तेथे एक कर्मचारी लागतो तर लस देण्यासाठी आणखी दोन कर्मचारी लागतात. शिवाय दररोज बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाचीही संख्या मोठी आहे. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळत कर्नाटक सीमेवरून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करून अहवाल द्यावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण करायचे? ओपीडी बघायची? की कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चाचणी करून त्यांना अहवाल द्यायचे? असे अनेक प्रश्न येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडत आहेत.
चौकट
कर्मचाऱ्यांची कमतरता
म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत म्हैसाळ, नरवाड, वड्डी, ढवळी, विजयनगर, धामणी, अंकली या गावांचा समावेश होताे. या ठिकाणी दोन आरोग्य सेवक व दोन आरोग्य सेविका यांच्या जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भरण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.