लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडी-भिवघाट या महामार्गावर वसलेल्या करगणी गावात आठवडी बाजार सध्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. महामार्गालगत अनेक विक्रेते आपला व्यवसाय थाटत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यालगत भाजीपाल्यासह धान्य विक्री केली जात असल्याने धुळीचा परिणाम होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजार आवार मोठा करून विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
करगणी गावच्या आठवडी बाजारासाठी करगणी परिसरातील अनेक गावातील नागरिक भाजीपाला, अन्नधान्य खरेदी-विक्रीसाठी येतात. शेटफळे, माळेवाडी, तळेवाडी, काळेवाडी, बाळेवाडी, हिवतड, गोमेवाडी, बनपुरी यासह आसपासच्या परिसरातील अनेक वाड्या वस्त्यावरील शेतकरी, नोकरदार, व्यापारी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीसाठी येतात.
दरम्यान, अनेक दशकापासून करगणीचा आठवडी बाजार हा ग्रामसचिवालयाच्या शेजारी भरत आहे. ग्रामसचिवालयाशेजारी बाजार भरण्यासाठी मोठे पटांगण आहे. मात्र बाजार पटांगणात काही नागरिकांनी अतिक्रमण करत गाळे बांधले असल्याने सध्या बाजाराला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
परिणामी भाजीपाला, अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू विकरणारे विक्रेते भिवघाट-आटपाडी महामार्गालगत ठाण मांडून असतात. यामुळे दर गुरुवारी माहमार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत.
चाैकट
पर्यायी व्यवस्थेची गरज
करगणी येथील दर गुरुवारी भरत असणाऱ्या आठवडी बाजारात रस्त्यावर विक्री करत असणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असून, ग्रामसचिवालयाच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या ओढा पात्रालगत मोठे पटांगण आहे. याठिकाणी पर्यायी व्यवस्था होऊ शकते. मात्र यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
फोटो-०४करगणी१