घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहंकाळ) येथे श्री काळभैरवनाथ मंदिराचे कलशारोहण व मूर्ती स्थापना सोहळा नुकताच झाला.
प्रारंभी सजवलेल्या रथातून कलशाची व मूर्तीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. तिचे जागोजागी स्वागत करण्यात आले. देशिंग येथील गुंडुबुवा मठाचे मठाधिपती आनंदगिरी महाराजांच्या हस्ते व ज्योतीताई संजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून प्रतिष्ठापना व कलशारोहण करण्यात आले.
यावेळी आनंदगिरी महाराज म्हणाले की, आध्यात्म हेच खऱ्या अर्थाने शांततेचे प्रतीक आहे. आध्यात्मामुळेच माणसामध्ये सौजन्य निर्माण होत असल्याने त्याची आज समाजाला नितांत गरज आहे.
ज्योतीताई पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावतीने खासदार निधीतून सात लाखांचा निधी जाहीर करत असल्याचे सांगितले.
यावेळी जतचे आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, भारती बँकेचे संचालक जितेश कदम, सभापती विकास हाक्के, माजी उपसभापती अनिल शिंदे, सरपंच पोपटराव गिड्डे (देशमुख), भाजपचे युवा नेते व मुख्य संयोजक महादेव पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष भीमराव माने, उपसरपंच बाबासाहेब मोहिते उपस्थित होते.
यावेळी मंदिराच्या उर्वरित कामासाठी चंद्रकांत हाक्के यानी ५१ हजारांची देणगी जाहीर केली. त्यांचा देवस्थान कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी स्वागत महादेव पाटील यांनी तर, आभार प्रा. भीमराव माने यानी मानले. सांगता महाप्रसाद वाटपाने करण्यात आली.
(फोटो ओळी :- कुंडलापूर (ता. कवठेमहंकाळ) येथील नव्याने जीर्णोदार केलेल्या काळभैरवनाथ मंदिराचे विधिवत उद्घाटन करताना ज्योतीताई संजयकाका पाटील. सोबत आनंदगिरी महाराज, चंद्रकात हाक्के, अनिल शिंदे व इतर.)