सांगली : पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सोमवारपासून होणारी सुनावणी महापुराच्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सोमवारपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार होती. आता १६ ऑगस्टपासून ही सुनावणी होणार आहे.
पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजले होते. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारपासून सलग तीन दिवस याची सुनावणी हाेणार होती. मात्र, जिल्ह्यात निर्माण झालेल्या महापूरस्थितीमुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह आरोपींच्या वकिलांनाही सुनावणीस हजर राहता आले नाही.
पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख न्यायालयात हजर होते. महापूरस्थितीमुळे सुनावणीस आलेल्या अडचणीवर चर्चा झाल्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता १६ ते १८ ऑगस्टदरम्यान याची सुनावणी होणार आहे.