सांगली : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला पाहिजे. असे विचार भारती अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मांडले. तर विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक शास्त्रांचा समन्वय साधूनच संशोधन केले पाहिजे. कारण यातूनच समाजाचा शाश्वत विकास होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘सामाजिक कल्याणासाठी विज्ञान, सामाजिक शास्त्रे व भाषा शास्त्रातील नवीन कल, आव्हाने व समस्या’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अमेरिकेच्या सालीसबरी विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी, शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन परिषदेस भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. पी. एम. पाटील, टी. आर. सावंत, डॉ. ए. आर. सुपले आदींसह संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन गायकवाड, अमोल वंडे, मंगेश गावित, डॉ. एम. टी. कोल्हाळ यांनी सहकार्य केले.