लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्ट्रवादीविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सांगलीत विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने प्रवीण दरेकर यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले.
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र महिला आघाडीच्यावतीने जिल्हा परिषदेसमोरील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी छाया जाधव म्हणाल्या, राष्ट्रवादीवर टीका करताना दरेकर यांनी समस्त महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला आहे. अशा या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा, अन्यथा विधानभवनासमोर आंदोलन करू.
आंदोलनात ज्योती आदाटे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, राधिका हारगे, वैशाली कळके, अमृता चोपडे, जसबीत खांगुरा, जयश्री भोसले, उषा पाटील, आशा पाटील, प्रणिती हिंग्लजे, प्रियंका तूपलोंढे, संध्या आवळे, शकुंतला हिंगमिरे, पूजा कोलप, वंदना सूर्यवंशी, शोभा झेंडे, वैशाली सूर्यवंशी, रंजना वावळ, रेश्मा मकानदार आदी उपस्थित होते.