सांगली : बेळगाव येथे प्रथमाचार्य शांतिसागर स्मारकाचे बांधकाम सुरू असून समाजातून देणगीदारांचे सहकार्य मिळत आहे. जीवनसंजीवनी फंडही एक कोटीचा करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.
दक्षिण भारत जैन सभेचा १२३ वा वर्धापन दिन सांगलीतील सभेच्या कार्यालयात झाला. यावेळी पाटील बोलत होते. केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) व महिला परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते अण्णासाहेब लठ्ठे आणि जैन महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा गोदूबाई उपाध्ये यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
पाटील म्हणाले, कोरोना संक्रमितांसाठी सभेने धान्य-भोजन कीट, कोरोना रुग्णालय करून योगदान दिले आहे. वीर सेवा दलाने रक्तदान शिबिर घेऊन ३५०० विक्रमी रक्त बॅगेचे संकलन केले आहे. सांगली बोर्डिंग, श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रम या शाखांचे नूतन इमारत बांधकाम, बेळगाव येथे प्रथमाचार्य शांतिसागर स्मारकाचे बांधकाम यासाठी देणगीदारांचे सहकार्य मिळत आहे. जीवनसंजीवनी फंडही एक कोटी करण्याचा संकल्प आहे.
सहखजिनदार पा. पा. पाटील, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पाटील-मजलेकर, पोपटलाल डोर्ले, शांतिनाथ नंदगावे, वीर सेवा दलाचे सचिव एन. जे. पाटील, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. ए. मुडलगी, प्रा. एस. डी. आकोळे, प्रा. बी. बी. शेंडगे, गजकुमार उपाध्ये, बोर्डिंगचे अध्यक्ष प्रा. राहुल चौगुले, अंजली कोले, कमल मिणचे, अनिता पाटील, चांदणी आरवाडे, गीतांजली उपाध्ये, सुवर्णा कागवाडे आदी उपस्थित होते.