ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथील उपसरपंचपदी माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाच्या जयश्री नागनाथ कोरे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच संगीता मुदुगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ही निवड करण्यात आली.
येथील ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ सदस्य असून, पाच सदस्य राष्ट्रवादीचे आमदार शिवाजीराव नाईक गट, महाडिक गट व भगत गटाचे चार सदस्य आहेत. तसेच सरपंच महाडिक गटाचा आहे.
राष्ट्रवादीचे उपसरपंच शहाजी पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीची सदस्य संख्या जास्त असूनदेखील माजी आमदार शिवाजीराव नाईक गट, भगत गट व महाडिक गटाने राजकीय डावपेच करून राष्ट्रवादीवर नामुष्कीची पाळी आणली. उपसरपंच पदासाठी जयश्री कोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर राष्ट्रवादीचे पाच सदस्य गैरहजर राहिले.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल मुदुगडे, जयकर पाटील, विजय पाटील, जगन्नाथ कोरे, एम. एस. पाटील, नागनाथ पाटील, शामराव भगत, अशोक कांबळे, शंकर जाधव, ग्रामसेवक दीपक इंगवले, तलाठी ए. व्ही. काकारवाल, सुदाम पाटील, आदी उपस्थित होते.