अशोक पाटील- इस्लामपूर पालिकेत माजी मंत्री जयंत पाटील यांची गेली २५ वर्षे सत्ता आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुनही, सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेदामुळे झालेल्या विकास कामांना भकासपणा आला आहे. यावर जयंत पाटील यांनी पालिकेत जाऊन वेळोवेळी खडे बोल सुनावले आहेत. तरीसुध्दा सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘ये रे माझ्या मागल्या...’ असाच चालू आहे. यावरुनच जयंत पाटील यांची पालिकेवरील पकड सैल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पालिकेत पक्षप्रतोद विजय पाटील गटाची सरशी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे नगराध्यक्ष दालनात विजय पाटील यांचे समर्थक पडून असतात. ते समाजसेवेचा आव आणत, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यावरच कुरघोड्या करताना दिसतात. त्यामुळेच कोरे सध्या अस्वस्थ आहेत. काही दिवसात ते आपल्या पदाचा राजीनामाही देतील, अशीच चर्चा आहे.संजय कोरे यांना एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांची साथ असली तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र विजय पाटील आणि खंडेराव जाधव तडजोडीचे राजकारण करीत आहेत. त्याचाच फटका कोरे यांना बसला आहे. सध्या पालिकेत विजय पाटील आणि खंडेराव जाधव यांची चलती आहे. डांगे गटाचे अॅड. चिमण डांगे यांची एन्ट्री झाली की दोन भाऊ एकदिलाचे असल्याचे दाखवतात. त्यानंतर भाऊ—नानांच्या कुरघोड्यांचा उद्योग सुरु होतो. त्यामुळे याचा फटका पालिका प्रशासनासह विकास कामांना बसल्याची चर्चा आहे.जयंत पाटील यांची शिस्त व नियोजनाला तोड नसल्याचे मानले जाते. इस्लामपूर शहराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवले आहे. तसेच मंत्रीपद नसल्याने पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही बेफाम झाले आहेत. जयंत पाटील यांचा वचक असता, तर नगराध्यक्षांच्या दालनाचा खेळखंडोबा झाला नसता, हे मात्र निश्चित.पालिकेतील सर्वच नगरसेवक माझेच आहेत. माझा कोणताही वेगळा गट नाही. संजय कोरे हे चांगले नगरसेवक आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आपण काहीही बोलणार नाही. पालिकेत गटांतर्गत राजकारण होत नाही.- विजय पाटील, पक्षप्रतोद.सत्ताधारी शहरातील रस्ते करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु त्यांची भुयारी गटारीची घोषणा कुठे गेली? चौक सुशोभिकरण, नियोजित विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत.- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक.संजय कोरे यांच्या भूमिकेबद्दल कोणतेही मत नाही. ते माझे मित्र आहेत. पालिकेतील कारभार स्वच्छ असावा, अशीच आमची भूमिका आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास केला जात आहे.- खंडेराव जाधव, सभापती, पाणीपुरवठा.
जयंतरावांची इस्लामपूर पालिकेवरील पकड सैल
By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST