दुष्काळी जत तालुक्यासाठी अतिरिक्त ६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी ते बाेलत हाेते.
ते म्हणाले की, म्हैसाळ विस्तारित योजनेचा पालकमंत्री पाटील यांनी गांभीर्याने विचार केला. या योजनेसाठी ६ टीएमसी पाण्याची उपलब्धता करून दिल्याबद्दल तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने मी आभार मानताे. पाण्याची उपलब्धता हा या योजनेचा मूळ पाया होता. हे कठीण काम केल्याबद्दल जत तालुका जयंत पाटील यांचा कायम ऋणी राहील. यामुळेच पक्षीय मतभेद विसरून आम्ही आपल्या सत्कारास आलो आहोत. जयंत पाटील आवश्यक त्या बाबी पूर्ण करून म्हैसाळ विस्तारित योजना लवकरच कार्यान्वित करतील असा विश्वास आहे. जयंत पाटील व अजित पवार या दोन माणसांनी मनात आणले तर आमचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण होऊन, तालुक्यातील प्रत्येक गाव सिंचनाखाली येण्यास कसलीही अडचण येणार नाही. राजकीयदृष्ट्या आपले पक्ष वेगळे असले तरी म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण होण्यासाठी कसलाही पक्षभेद न मानता जयंत पाटील यांच्यामागे ठाम राहू.
चाैकट
राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करू : जयंत पाटील
यावेळी जयंत पाटील म्हणाले, यापुढील काळात या याेजनेला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, अर्थसंकल्पामध्ये तरतूद या गोष्टी वेगाने करून राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करू, पुढील प्रक्रियेसाठी वेळ लागेल, पण निश्चितपणे म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी सर्व शक्ती पणाला लावू.