जत : जत तालुक्याच्या विकासाचा एकमेव केंद्रबिंदू असलेला डफळे साखर कारखाना विकत घेऊन आमदार जयंत पाटील यांनी सहकार मोडीत काढला. त्यांनी सहकाराच्या गप्पा मारु नयेत. त्यांच्या स्वार्थी आणि मतलबी राजकारणामुळे सुमारे २७ हजार सभासद व ऊस उत्पादक देशोधडीला लागले आहेत, असा आरोप सांगली जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केला.डफळे साखर कारखाना लिलावात विकत घेताना त्याची किंंमत फक्त पन्नास कोटी रुपये दाखविण्यात आली आहे आणि लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन त्यावर बँकेकडून कर्ज घेताना त्याची किंमत दोनशे कोटी रुपये दाखविण्यात आली आहे. आमदार विलासराव जगताप व आमदार जयंत पाटील यांनी संगनमत करुन डफळे साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे येथील सभासद आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. ते म्हणाले की, डफळे कारखान्यासंदर्भात आ. जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर तालुक्यात मते मागण्यासाठी यावे, अशी मागणी त्यांनी केली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आ. विलासराव जगताप यांना अपयश पचवता आले नाही. जेथे भाजपचा पराभव झाला आहे, तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, गावातील दोन गटात भांडण लावणे यासह प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय दबाव टाकून कुरघोडीचे राजकारण ते करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, जत नगरपालिका नगराध्यक्ष निवड, ग्रामपंचायत निवडणूक येथे आम्ही विलासराव जगताप यांचा पराभव केला आहे. जनतेने त्यांना नाकारले आहे. बाजार समिती निवडणुकीतही आम्ही त्यांचा पराभव करणार आहोत. तालुक्यात भीषण चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. यासंदर्भात पावसाळी विधानसभा अधिवेशनात त्यांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही किंवा म्हैसाळ कॅनॉलमधून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला नाही. तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांतील नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्यांनी एक फार्स केला आहे. (वार्ताहर)बाजार समिती निवडणुकीत वसंतदादा आघाडीस उघड पाठिंबा दिला आहे. उघडपणे प्रचारही करणार आहे, मात्र अद्याप कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. सध्याची स्थिती पाहता लगेचच कार्यकर्ते एकत्र येणे शक्य नाही. लवकरच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरपणे कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. - आकाराम मासाळमाजी सभापती, जिल्हा परिषद मासाळ कॉग्रेसमध्येमाजी समाजकल्याण समिती सभापती व धनगर समाजाचे नेते आकाराम मासाळ आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बुधवार, दि. ५ रोजी काँग्रेस पक्षात आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आमचे मताधिक्य वाढणार आहे, असे विक्रम सावंत व सुरेश शिंदे यांनी सांगितले..
जयंतरावांनी सहकाराच्या गप्पा मारु नयेत
By admin | Updated: August 4, 2015 23:39 IST