फोटो ओळ : वडगाव (ता. तासगाव) येथे २६ मराठा लाइफ इन्फंट्रीच्या वतीने सुभेदार राजेंद्र दळवी यांनी हवालदार दशरथ पाटील यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
फोटो-०९गव्हाण२
फोटो ओळ : वडगाव (ता. तासगाव) येथे हवालदार दशरथ पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गव्हाण : वडगाव (ता. तासगाव) येथील पुत्र व भारतीय सैन्य दलातील २६ मराठा लाइफ इन्फंट्रीचे हवालदार दशरथ पोपट पाटील (वय ३९) यांना बुधवारी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. वडगाव-अंजनी रस्त्यावर हवालदार दशरथ पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील मान्यवरांनी दशरथ पाटील यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
हवालदार दशरथ पाटील जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये कार्यरत होते. सोमवारी सकाळी अखनूर जम्मूच्या (केएनटी) खौर तालुक्यात जोगवानच्या नथू टिबा भागात नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना कपाळावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री हवालदार दशरथ पाटील यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. बुधवारी सकाळी पार्थिव वडगाव या जन्मगावी आणण्यात आले. सुरुवातीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गावातील शहीद महादेव पाटील कलामंचच्या शेजारी ठेवण्यात आले. यानंतर पार्थिव दशरथ पाटील यांच्या घरी नेण्यात आले.
येथे कुटुंबियांनी दर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. याठिकाणी २६ मराठा लाइफ इन्फंट्रीचे सुभेदार राजेंद्र बाजीराव दळवी, हवालदार सचिन जमादार, महेश यादव, शिवाजी मगर, भाऊसाहेब यादव, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पांडुरंग भोसले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम, गटविकास अधिकारी दीपा बापट, सरपंच रमेश पवार, उपसरपंच सचिन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.