डफळापूर : जत पश्चिम भागात सतत दुष्काळाशी सामना करीत शेतकऱ्यांनी पाण्याच्या शोधात मोठ्या संख्येने कूपनलिका खोदल्या असल्याने, शेकडो विहिरींतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरी मोठ्या प्रमाणात कोरड्या पडल्यामुळे त्या असून अडचण नसून खोळंबा बनल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.सतत दुष्काळ पडत गेल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचा उद्देश डोळ्यासभोर ठेवून पाण्याच्या शोधात गेली वीस ते पंचवीस वर्षे झाली. कूपनलिका खोदण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर विजेची मागणीही वाढली. विजेच्या मोटारी आल्याने विहिरीवर मोट टाकणे शेतकऱ्यांनी बंद केले. विहिरीत व कूपनलिकेमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत गेला. मोठ्या प्रमाणात कूपनलिका खोदल्या गेल्याने जमिनीची अक्षरश: चाळण झाली. ठिबक सिंचनचा म्हणावा तसा वापर न केल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडून वाया गेल्याने भूगर्भातील पाणीसाठा रिकामा होत गेला. पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांनी चढाओढीने ५०० ते हजार, बाराशे फूट कूपनलिका खोदल्या. साठ ते सत्तर फूट खोल असणाऱ्या विहिरीतील पाण्याने तळ गाठला. विहिरी उपयोगाच्या ठरत नसल्याने विहिरी खोदण्याचे प्रमाण कमी झाले व कूपनलिका खोदणे शेतकऱ्यांनी पसंत केले. यापूर्वी विहिरी असणे, पाणी टिकून राहणे हे शेतकऱ्यांना विश्वासाचे वाटत असे. परंतु आता कूपनलिका खोदली असता, पाणी जरी मोठ्या प्रमाणात लागले तरी, हे पाणी टिकून राहील यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. खोदलेल्या कूपनलिकांपैकी ८० टक्के कूपनलिका पाण्याअभावी निकामी झाल्या आहेत. कूपनलिका वाढत गेल्या, त्या प्रमाणात पाणाड्या व्यक्तींचेही प्रमाण वाढत गेले. पाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली आहे. पाण्याच्या शोधात जास्तीत जास्त खोलीवरून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली असली तरी, शेतकऱ्यांनी हातच्या विहिरी निरुपयोगी करून ठेवल्या, ही शोकांतिका म्हणावी लागेल. (वार्ताहर)शेतकऱ्यांची पिळवणूकपाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे.
जत पश्चिममधील विहिरींनी गाठला तळ
By admin | Updated: November 17, 2014 23:23 IST