उमदी : आम्हीच म्हैसाळ योजनेचे पाणी आणले म्हणून पूजन करणाऱ्या तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतः श्रेय घेणे थांबवावे. खा. संजयकाका पाटील व माजी आ. विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात आणले आहे. आ. विक्रम सावंत यांनी बंदिस्त पाइपलाइनद्वारे आलेल्या पाण्याची मंजुरी कोणाच्या कालावधीत मिळाली यांचा खुलासा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मानगौडा रवी -पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.
यावेळी युवा नेते संजयकुमार तेली, अध्यक्ष सोमनिंग बोरामणी उपस्थित होते.
यावेळी तम्मानगौडा रवी -पाटील म्हणाले की, आ. सावंत यांनी फक्त कोविड केंद्राचे उद्घाटन करून प्रसिद्धी मिळवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मात्र, त्याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. आम्ही माजी आ. जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जत तालुक्यासाठी जत येथे सर्व सोयी असलेले कोविड सेंटर सुुरू केले आहे. जत पूर्व भागात येणारे पाणी अथवा म्हैसाळ योजनेचे काम हे माजी मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस, जगताप यांच्या पाठपुराव्याने पूर्णत्वात येत आहे. भाजपच्याच सर्व नेतेमंडळींनी म्हैसाळच्या पाण्यासाठी लढा उभारून निधी उपलब्ध करून दिला आहे. विक्रम सावंत यांनी तुबची बबलेश्वरचे पाणी मिळावे, याकरिता माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत फक्त मेळावे घेतले. जर का मेळाव्यासाठी केलेला खर्च म्हैसाळ योजनेसाठी केला असता तर लवकर पाणी आले असते, अशी टीकाही त्यांनी केली.
चौकट
जत तालुक्यातील संख तलाव, अंकलगी तलाव, सिद्धेश्वर तलावासह सर्व तलाव उन्हाळ्यात भरा तुमचे फोटो देवाऱ्यावर ठेवून पूजा करण्यात येईल. पावसाच्या पाण्याचे व खा. संजयकाका पाटील व माजी आ. जगताप यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणे थांबवा. तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व युती शासनाच्या प्रयत्नानेच म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण होत आहे, असे युवा नेते संजय तेली यांनी सांगितले.